मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.
मान्सून वारे येत्या दिन तीन दिवसात कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील सहा राज्यात संततधार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात येत्या दोन तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ११ जूनला मुंबईत मान्सून धडकणार असून मुंबईत मुसळधार पाऊस पडेल.
गेले दोन दिवस मुंबईत मान्सून पूर्व सरी कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. यंदा जून ते सप्टेंबर मध्ये १०२ % पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. ११ जून रोजी मुंबईत पाऊस सुरु होईल. चक्रीवादळानंतर मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र आता पुन्हा हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबईचे वातावरण थंड झाले आहे. मान्सून सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत पोहोचले आहे. पुढच्या दोन दिवसात दक्षिण कर्नाटकाचा काही भाग तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातील सर्व भागात मान्सून वाऱ्यांनी प्रगती केली आहे. आता ते लवकरच महाराष्ट्रात येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.