हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत संचारबंदी वाढविली असून नियम शिथिल केले आहेत. मात्र देशातील पर्यायाने राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून आता राज्य सरकारने भिवंडी शहरात कडक संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत संचारबंदीचे नियम शिथिल करून राज्यतील अर्थव्यस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कामकाज सुरु करण्यात आले आहे. दरम्यान भिवंडी येथील रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने इथे १५ दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
१८ जून ते ३ जुलै दरम्यान या परिसरात कडक संचारबंदी असणार आहे. प्रशासनाने तशा सूचना जारी केल्या आहेत. भिवंडी शहरात दाटीवाटीची वस्ती असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण होत आहे. करोनाचा फैलाव वाढत असल्याने महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा क़डक लॉकडाउन जाहीर केला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दिला. आयुक्तांनीही यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून हे शहर पूर्णतः बंद असेल.
या काळात शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी सर्वांच्या काळजीसाठी केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने जसे की, मेडिकल आणि दूध, किराणा दुकाने ठराविक वेळेसाठी सुरु राहतील असे सांगितलं आहे. याबाबत पोलीस, जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकारला कळवण्यात आले असल्याचे प्रतिभा पाटील यांनी सांगितले आहे. भिवंडी शहरात मंगळवार संध्याकाळपर्यंत कोरोनाच्या ६५० रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यातही मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.




