रवी राणांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

अमरावती जिल्ह्यात मतदानाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. अपक्ष राहूनही आपण निवडून येऊ शकतो असा दांडगा आत्मविश्वास सोबत असलेल्या राणा परिवाराने आज मतदानाचा अधिकार बजावला. विद्यमान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली.

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.  

मुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांतपणे आणि शिस्तीत मतदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र मतदानाला हिंसक स्वरूप आणि बोगसपणाचं गालबोट लागल्याचं निदर्शनास आलं आहे. करमाळा येथे दोन अपक्ष उमेदवारांच्या गटामध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदान स्लिपवर नाव आणि नंबर असतानाही, कुठल्याच ओळ्खपत्राची तपासणी न करता दुसरी महिला मतदान करून गेल्यामुळे मतदानाचा हक्क न बजावता येणाऱ्या महिलेने आपली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

‘मतदान करा आणि मिळवा मिसळवर १० % डिस्काउंट’

”खणखणीत मत देऊन आलोय.. झणझणीत मिसळ खायला” हे घोषवाक्य आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी मिसळ यांचं. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मतदान करून आल्यानंतर मिसळ वरती १०% डिस्काउंट दिला या ‘लक्ष्मी मिसळ’ यांनी दिला आहे. यावेळी ‘मतदान केलेलं बोट दाखवा आणि १०% डिस्काउंट मिळवा’ अशी खास ऑफर त्यांनी मतदारांना ठेवली आहे.

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

सोलापुरात मतदान केंद्रात शिरले पाणी; मतदानावर परिणाम

या विधानसभा निवडणुकीमध्ये निसर्गाने उमेद्वारांचीच नाही तर मतदारांनचीही परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने कहर केला आहे. अद्यापदेखील राज्यात पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचारादरम्यान देखील पावसाने अनेक सभा, रॅलीचे नियोजन फिस्कटवले. काही सभा आणि रॅली भर पावसात देखील पार पडल्या.

राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ‘ईव्हीएम’मध्ये नोंद होणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात ‘त्या’ चार गावांचा मतदानावर बहिष्कार

मोहोळ विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तारापूर, वीटे, पोहरगाव, खरसोळी या चार गावांना आज ही पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळं या चार गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात सदर चारही गावातील सरपंचानी एकत्रित येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. येथील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोर जाव लागत आहे.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.