मुंबई । जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्राला ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळानंतर कोकणातील नुकसान पाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही सहकाऱ्यांसमवेत कोकण दौरा केला होता. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाधितांना मदत करण्याचे निवेदन दिले आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील समितीदेखील त्यांच्यासमवेत उपस्थित होती. दोन दिवसाच्या कोकणदौऱ्यात त्यांनी केलेल्या पाहणीनुसार तेथील बाधित नागरिकांना मदत देण्याच्या दृष्टीने एक निवेदन त्यांनी यावेळी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी एक बैठक घेतली ज्यामध्ये चक्रीवादळाच्या एकूण नुकसान आणि पुढील उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.
दौऱ्यामध्ये फडणवीस यांना फलोत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यापर्यंत पोहोचणारी शासकीय मदत अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे. तेही त्यांनी या बैठकीत सांगितले. जून महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोकण दौरा केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.