नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांना नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. वय वर्षे ४५ च्या आतील नोंदणीकृत तसेच कोणतीही वैद्यकीय समस्या नसलेल्या आणि आपली इंटर्नशिप पूर्ण केलेल्या कोणालाही याअंतर्गत अर्ज करता येणार आहे. तसेच फेब्रुवारी २०१९ साली एमबीबीएस चे अंतिम वर्ष पास झालेल्या ४००० वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही त्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या मुंबईतील परिस्थिती भीषण होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता आहे. म्हणूनच अमित देशमुख यांनी असे आवाहन केलं आहे. जे डॉक्टर, नर्सेस यासाठी नियुक्त केले जातील त्यांना बृहमुंबई महानगरपालिका यांच्याकडून मानधन दिले जाईल. फिजिशियननाही मानधन तत्वांवर नेमले जाणार आहे. डॉक्टरांना ८०,००० प्रति महिना, ऍनेस्थेटिस्टस आणि इंटेन्सिव्हिस्टस याना २ लाख रु प्रति महिना तर पात्र नर्सेस ना ३०,००० रु प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.

 

अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसकर यांना निर्देश दिले आहेत की, जे विद्यार्थी फेब्रुवारी २०१९ ला अंतिम वर्षांची परीक्षा पास झाले आहेत, आणि इंटर्नशिप पूर्ण केली आहे. त्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यात यावे. या प्रमाणपत्राच्या साहाय्याने हे विद्यार्थी अर्ज करू शकतील. जवळपास ४००० विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर २०१८ ला एमबीबीएम ची परीक्षा दिली आहे ज्याचे निकाल फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर झाले आहेत आणि यावर्षी त्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ फेब्रुवारी मध्ये होणार होता. जो सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर पडला आहे. पण हे ४००० डॉक्टर उपचारासाठी सेवा बजावू शकतील असा त्यांचा विश्वास आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.