हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. मात्र पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान हत्या झालेल्या उद्योगपतीने या तिन्ही आरोपींना आपल्याच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. या मृत उद्योगपतीवर गेली अनेक वर्ष कर्जाचा डोंगर उभा होता. यातून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी तसेच आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला आपल्या इंशुरन्सचे पैसे मिळावे यासाठी या उद्योगपतीनेच आपल्या हत्येची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं आहे.
हा उद्योगपती ९ जून रोजी दिल्लीमधील आपल्या आनंद विहार या भागातून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबाने परिवाराने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. १० जून रोजी दिल्ली पोलिसांना बापरोला विहार भागात खेदी वाला पुलाजवळ एका माणसाचा गळफास घेतलेला मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. यावेळी मृतदेहाचे हात बांधलेले असल्याचं पोलिसांना आढळलं. अधिक तपास केला असता तो मृतदेह आनंद विहार भागातून बेपत्ता झालेल्या उद्योगपतीचा असल्याचं पोलिसांना कळलं. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला होता.
पोलिसांनी आपल्या खबऱ्यांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे एका संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या चौकशीदरम्यानच या संशयित आरोपीने उद्योगपतीच्या हत्येत आपला सहभाग असल्याचं कबुल केलं. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवरुन हत्येत सहभागी असलेल्या इतर दोन आरोपींनाही अटक केली. या आरोपीं बरोबरीला चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरुन, स्वतः त्या उद्योगपतीनेच आपल्या हत्येची सुपारी या तिघांना दिल्याचं पुढे आलं आहे. या कामासाठी या तिघांना पैसेही देण्यात आले होते, आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील असं सांगत आपली हत्या करण्यासाठी पैसे दिल्याचं आरोपींनी पोलिसांसमोर कबुल केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.