हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण माहितीवर आधारित असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी अपूर्ण माहितीद्वारे म्हणणे ऐकून न घेता अग्रलेख लिहिला असल्याचा आरोप शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ‘कोणत्याही बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाही तर आमचे विषय महाराष्ट्राच्या जनतेशी निगडित आहेत. त्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही बैठका मागतो आहोत. खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं. ते ऐकलं तर माननीय मुख्यमंत्र्याचंही समाधान होईल.’ असे सडेतोड उत्तर दिले आहे. ‘काही कारणामुळे ते व्यस्त होते. काही दुःखद घटनांमुळे ते भेटू शकले नाहीत आज उद्या ते भेटतील. तेव्हा आम्ही आमचं म्हणणं मांडू मग सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा कारण त्यांच्या अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातो आहे. आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहोत. आघाडीबरोबर राहणार आहोत.’ असेही ते यावेळी म्हणाले.
काही चर्चा करणे, काही विषय मांडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे प्रमुख, आघाडीचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे ते ऐकून घेतल्यानंतर नक्कीच ते समाधानी होतील. असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर काँग्रेसच्या जागा या इतर पक्षापेक्षा कमी असल्याचे या अग्रलेखात म्हंटले आहे असे विचारल्यावर थोरात यांनी ‘आम्ही आमच्या जागानुसारच मंत्रिमंडळात जागा घेतली आहे.’ त्यावर काहीच बोलण्याची गरज नाही असे म्हटले आहे. तर आम्हांला राज्याच्या हितसंबंधी बोलायचे आहे त्यांनी ऐकून घ्यावे असे म्हणत नंतर पुन्हा अग्रलेख लिहावा असेही सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.