हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबवावा असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संसर्गापासून दूर असणाऱ्या शाळांमध्ये प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र सर्वाना आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे. आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एकवेळ शाळा सुरु झाल्या नाहीत तरी शिक्षण सुरु पाहिजे असे सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या शाळा रेड झोनमध्ये नाहीत अशा ९वी, १०वी आणि १२वी च्या शाळा-महाविद्यालये जुलैपासून सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ६ वी ते ८ वी चे ऑगस्टपासून तर ३ री ते ५ वी पर्यंतचे वर्ग सप्टेंबर पासून सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ११ वी चे वर्ग दहावीचे निकाल लागल्यानंतर पुढच्या महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच १ली व २री चे वर्ग हे व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनंतरच सुरु होणार आहेत. ज्या ठिकाणच्या शाळा सुरु होणार नाहीत अशा ठिकाणी पूर्वी ठरल्याप्रमाणे टाटा स्काय आणि जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट तातडीने सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितलं आहे.
पालकांच्या मतांचा विचार करून पहिली, दुसरीच्या लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी बैठकीदरम्यान दिली. वर्षा गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमे देखील उपलब्ध करून घेतली जातील असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.