मेढा प्रतिनिधी । सध्या जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. जगभरात कोरोनावर औषध शोधण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस-रात्र झटत आहेत. कोरोना विषाणूच्या लसीची मानवी चाचणी माझ्या देहावर करावी अशी मागणी जावली तालुक्यांतील मेढा गावातील नागरीकाने केली आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे. ही मागणी करणाऱ्या नागरिकाचे नाव किसन साळुंखे असे आहे.
व्यवसायाने साईन बोर्ड पेंटर असणार्या किसन पांडूरंग सांळूखे यांच्या या निवेदनामुळे ते चर्चेत आले आहेत. ५५ वर्षाचे साळुंखे मेढा गावातील आंबेडकरनगर येथे राहतात. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे, ‘भारतात आज कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना मी श्रद्धांजली वाहतो तर कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांना माझ्या शुभेच्छा आहेत. या विषाणूची लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ जीवाची बाजी लावत आहेत. त्यांच्या या मेहनतीला फळ येण्यासाठी मी कोरोनाच्या लसीची चाचणी माझ्या देहावर करावी अशी विनंती करत आहे.’
नेहमी वर्तमानपत्रांमध्ये मी वाचतो की लसींच्या चाचणीसाठी प्राण्यांचे शरीर वापरले जाते. मी ५५ वर्षे माझे जीवन सुख समाधानात घालवले आहे. मला कोणतेच आजार अथवा व्याधी माही आहेत. मी शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त आहे. म्हणूनच मी राज्यातील शास्त्रज्ञांना माझा देह चाचणीसाठी वापरावा अशी विनंती करतो असेही ते या निवेदनात म्हणाले आहेत. तसेच हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे. सबंधित निवेदन सांळूखे यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात २९ जून रोजी दिले आहे. त्याची पोचही त्यांनी घेतली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.