हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदी मुळे अनेक क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाही या संचारबंदीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते आहे. चित्रीकरण बंद असल्याने अनेक चांगल्या कलाकारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. नैराश्य, आर्थिक कुचंबणा आणि अभिनयाची संधी मिळत नसल्याने छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याने गावची वाट धरली आहे. शार्दूल कुणाल पंडित आता त्याच्या गावी परत निघून गेला आहे.
‘बंदिनी’, ‘कितनी मोहब्बत है २’, ‘कुलदीपक’ आणि ‘सिद्धी विनायक’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं. “२०१२ मध्ये दुबईतील मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी मी अभिनय सोडलं होतं. पण त्या कामात मन न रमल्याने मी तीन वर्षांनंतर मुंबईला परतलो. मुंबईत आल्यावर मला ‘कुलदीपक’ मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली आणि एका क्रिकेट शोचं सूत्रसंचालनदेखील केलं. मात्र हा शो मध्येच बंद पडला आणि माझे पैसेसुद्धा त्यामुळे अडकले. त्यानंतर इतर काही प्रोजेक्ट्ससाठी प्रयत्न केले, पण हाती काहीच आलं नाही. त्यातच मी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आजारी होतो. लॉकडाउनच्या आधी मला एका वेब सीरिजची ऑफर मिळाली होती. पण त्याचंही पुढे काहीच झालं नाही. गेल्या तीन महिन्यांत माझ्याकडे जमा केलेले सर्व पैसेसुद्धा संपले.” असे त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे सांगितले.
आजारपण आणि काम नसल्यामुळे आलेलं नैराश्य यामुळे शार्दूलने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. “नकार, अपयश, आजारपण या सर्व कारणांमुळे मी नैराश्यात गेलो. मानसोपचारतज्ज्ञांचीही मी मदत घेतली. मला मुंबई सोडायची नव्हती. पण आता माझ्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नाही. माझं काम बंद असलं तरी इथे मला घराचं भाडं आणि इतर गोष्टींवर खूप पैसा खर्च करावा लागतोय. त्यामुळे मी गावी जाण्याचा निर्णय घेतलाय”, असं त्याने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने देखील आपल्याकडचे पैसे संपले असल्याची माहिती दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.