सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध मुद्द्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांसमोर आपले मतही मांडले आहे.
या भेटीमध्ये उदयनराजेंनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात राज्यातील तज्ञ तसेच शास्त्रज्ञांची बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्र तसेच राज्य सरकारने राज्यातील लोकांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे, आता त्यांची सहनशक्ती संपत आली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. जर लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्याला नियंत्रित करता येणार नाही असे मत त्यांनी मांडले.
दरम्यान केवळ ते म्हणाले, कोरोनामुळेच मृत्यू होतो असे नाही किती दिवस आपण असे भीतीच्या छायेखाली जगणार आहोत. सर्वत्र कोरोनाची चर्चा असल्याने इतर आजारांनी बाधित असणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे असे ते म्हणाले. त्यांनी कोरोना मुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन झाले पाहिजे असे मत मांडले. रेल्वे मंत्रालयाला सातारा जिल्ह्यात बोगी निर्मितीच्या प्रकल्प उभारणी साठी प्रस्ताव दिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भारत चीन सीमाप्रश्न तणावावर बोलताना ते म्हणाले, ‘हा सर्व वेड्याचा बाजार आहे ही लढाईची वेळ नाही आणि काळही नाही.’ यासोबतच उप-मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल अधिकृत माहिती दिली गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.