नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत.
पाच कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलं आहे. यातील २९२३ व्हेंटिलेटर्स तयार झाले असून १३४० व्हेंटिलेटर्सचं वाटप राज्यांना करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीला २७५, गुजरातला १७५, बिहारला १००, कर्नाटकला ९० आणि राजस्थानला ७५ व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत.
एकूण ५० हजार व्हेंटिलेटर्सपैकी ३० हजार भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून, १० हजार अगवा हेल्थकेअरकडून, AMTZ बेसिककडून ४५५०, AMTZ एन्डकडून ४००० तर अलाईड मेडिकल कंपनीकडून ३५० व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली जाणार आहे. कोरोना बाधित पेशंटसाठी व्हेंटिलेटरची आत्यंतिक आवश्यकता असून भारताने PM Care फंडमधील सर्वाधिक निधी यावर वापरायचं ठरवलं आहे.
याशिवाय १ हजार कोटी हे परप्रांतीय मजुरांच्या विविध सेवेसाठी प्रत्येक राज्याला देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक १८१ कोटी, उत्तरप्रदेशाला १०३ कोटी, गुजरातला ६६ कोटी, दिल्लीला ५५ कोटी आणि इतर महत्वाच्या राज्यांनाही सरासरी ५० कोटींची मदत देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.