आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काल माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पाठोपाठ आज विद्यमान आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार गाडगीळ यांना होम आयसोलेशन करण्यात आले असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या हि ७ हजारांच्यावर गेली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या पाठोपाठ आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी मिरजेतील आमदार सुरेश खाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्या पाठोपाठ काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांना काल कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पार्किन्सन या जुन्या आजारावर उपचार करण्यासाठी ते या रुग्णालयात दाखल होते. खबरदारीसाठी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे पुत्र गौतम पवार यांनी सांगितले.

दरम्यान आज, सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यांना सध्या होम आयसोलेशन करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.