हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या काळात या साथीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूकीद्वारे (ऑनलाईन फ्रॉड) लाखो लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सायबर हल्ल्याचा इशारा दिला आहे. एसबीआयने अनेक शहरांतील आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि वैयक्तिक संदेशांद्वारे बनावट ई-मेल पासून सावध राहावे असा सल्ला दिला आहे. यापूर्वी भारत सरकारनेही एक अॅडवायजरी जारी केली आणि सर्वसामान्यांना आणि संस्थांना मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविली.
या ई-मेल अॅड्रेसवरुन आलेल्या ईमेलवर क्लिक करु नका
एसबीआयने ट्वीट व संदेशांद्वारे आपल्या ग्राहकांना सांगितले की, ‘देशातील अनेक शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होणार आहे हे आमच्या लक्षात आले आहे. फ्री मध्ये कोविड -१९ ची चाचणी साठी ncov2019@gov.in या ईमेल अॅड्रेसवरुन आलेल्या कोणत्याही ईमेलवर क्लिक करू नका. एसबीआयने आपल्या संदेशामध्ये सांगितले आहे की हॅकर्सने 20 लाख भारतीयांचे ई-मेल अॅड्रेस मिळवले आहेत. ते फ्री मध्ये कोरोना चाचणी करण्याच्या नावाखाली ईमेल पाठवून त्यांचे पर्सनल आणि बँक डिटेल्स मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हॅकर्स असे मिळवतात बँक खात्याचे अॅक्सेस
स्टेट बँकेच्या म्हणण्यानुसार, हॅकर्सच्या निशाण्यावर खासकरुन दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद मधील लोक आहेत. Ncov2019@gov.in या ईमेल अॅड्रेसवरून हॅकर्सकडून पाठविलेल्या ई-मेलवर क्लिक केल्यावर युझर्स एका फेक वेबसाइटवर पोहोचतात. यानंतर या फेक वेबसाइटवर आपली पर्सनल किंवा बँक खात्याची डिटेल्स दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तविक, जेव्हा युझर हॅकर्सना आपली वैयक्तिक माहिती देतो तेव्हा त्यांच्या बँक खात्यात प्रवेश मिळविणे त्यांच्यासाठी सोपे होते. अशा परिस्थितीत युझरचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.
Attention! It has come to our notice that a cyber attack is going to take place in major cities of India. Kindly refrain yourself from clicking on emails coming from ncov2019@gov.in with a subject line Free COVID-19 Testing. pic.twitter.com/RbZolCjLMW
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 21, 2020
CERT-In ने सायबर हल्ल्याचा इशारा जारी केला आहे
भारतीय कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमनेही (CERT-In ) शनिवारीच प्रत्येक सरकारी विभाग, संस्था आणि नागरिकांनाही याबाबत चेतावणी दिली होती की लवकरच एक मोठा सायबर हल्ला होऊ शकेल. याचा इशारा देऊन असे म्हटले गेले होते की, कोविड -१९ चाचणीच्या नावाखाली हे हॅकर्स सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी 2016 मध्येही देशातील बँकिंग संस्थांना अशा सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. यात हॅकर्सनी अनेक ग्राहकांच्या डेबिट कार्डच्या पिनसह बरीच गोपनीय माहिती चोरली होती. यानंतर एसबीआयने आपल्या ग्राहकांना 6 लाख नवीन डेबिट कार्ड जारी केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.