हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी एफआयआर नोंदविण्यासाठी लखनौच्या सीजेएम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. एसीजेएम कोर्टानेही याप्रकरणी दाखल केलेला अर्ज मान्य केलेला आहे. कोर्टाने फिर्यादीला ३० जूनला साक्षीसाठी बोलावले आहे. करण जोहर, एकता कपूर, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने तक्रार दाखल केली आहे.
या दाखल केलेल्या अर्जात, सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी करण्यात आलेली आहे. सुशांतसिंग राजपूतने मुंबईच्या वांद्रे येथील आपल्या फ्लॅटमध्ये फॅनला लटकावून घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये एका नवीन चर्चेला उधाण आले आहे. बॉलिवूडच्या एका चमूतून असा आरोप केला जातो आहे की चित्रपट उद्योगातील प्रस्थापित कलाकार हे नव्या कलाकारांना पुढे जाण्यापासून रोखतात. सुशांतच्या बाबतीतही हे घडले. ज्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने हे आत्महत्येचे पाऊल उचलले.
अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या प्रकरणात ज्या ४ लोकांच्या विरोधात अर्ज दाखल केला गेला आहे अशा प्रकरणाला कंप्लेंट केस असे म्हटले जाते. ही दाखल करण्यात आलेली कंप्लेंट केस मेन्टेनेबल आहे की नाही याचा निर्णय आता कोर्टात घेण्यात येईल. अशा अर्जावर आरोपीचे उत्तर आल्यानंतरच गुन्हा नोंदविला जातो. अशी तक्रार दाखल करण्यासाठी योग्य ती कारणे किंवा सबळ पुरावे द्यावे लागतात.
बिहारमधील रहिवासी सुधीर ओझा यांनी सुशांत आत्महत्येप्रकरणी दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत सलमान खान तसेच निर्माता करण जौहर, आदित्य चोप्रा, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, साजिद नाडियाडवाला यांच्यासह चित्रपट जगतातील ८ व्यक्तींचा समावेश आहे. याप्रकरणी मुजफ्फरपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या या तक्रारीनुसार फिर्यादीने या सर्व आरोपींवर मृत अभिनेता सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला गेला आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत असे लिहिले आहे की सुशांत हा बिहारचा रहिवासी होता आणि आपल्या कौशल्यामुळे त्याने इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख निर्माण केली होती, त्यामुळे सर्व आरोपींनी सुशांतच्या विरोधात कट रचला आणि त्याला चित्रपटांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.