राज्यभर गाजलेल्या ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधाराचा अज्ञातांकडून थरारक पाठलाग करत निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधार मैनुद्दीन उर्फ राजू अबूबकर मुल्ला याचा अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शास्त्राने डोक्यात निर्घृण वार करत खून केला. सदर खुनाची घटना शुक्रवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगलीतील गणेशनगर येथील गल्ली नंबर पाच येथील एका बिल्डिंग मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी कोयता हस्तगत केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, २०१६ साली वारणानगर येथील नऊ कोटींच्या चोरीचे प्रकरण गाजलेले होते. मैनुद्दीन मुल्ला याने हि रक्कम चोरल्याचा संशय होता. त्यानांतर या प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. सध्या सर्वजण जामिनावर बाहेर आहेत. मैनुद्दीन मुल्ला यालाही जमीन मिळाला होता. मयत मैनुद्दीन मुल्ला हा शुक्रवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगलीतील गणेशनगर येथे आला होता. त्या ठिकाणी हातात धारदार शस्त्रे घेऊन चार ते पाच जण पाठलाग करत असल्याचे इथल्या काही नागरिकांनी पहिले. गणेशनगर येथील पाचव्या गल्लीतील रॉकेलवाले गल्ली येथे असणाऱ्या एका बिल्डिंग मध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी मुल्ला गेला. त्याठिकाणी हल्लेखोरांनी त्याला गाठत धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात खोलवर निर्घृण वार केले. वार वर्मी बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे फौजफाट्यासह दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृत मुल्ला याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उडालेली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.