सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
कुपवाड एमआयडीसी मध्ये काल शुक्रवारी भर दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या खुनाचा उलगडा २४ तासाच्या आत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून निलेश गडदे याने त्यांच्या मित्रांसमावेश थरारक पाठलाग करून निर्घृणपणे दत्तात्रय पाटोळे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्ये प्रकरणी निलेश विठोबा गडदे (वय २१ रा. वाघमोडेनगर कुपवाड) सचिन अज्ञान चव्हाण (वय-२२ रा, आर पी पाटील शाळेजवळ कुपवाड, वैभव विष्णु शेजाळ (वय २१ वाघमोडेनगर कुपवाड, मृत्युंजय नारायण पाटोळे (वय २७ रा. आंबा चौक यशवंतनगर आणि किरण शंकर लोखंडे (वय १९ रा वाघमोडेनगर कुपवाड) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कुपवाड एमआयडीसी येथील रोहिणी कोल्ड स्टोअरेज मध्ये राष्ट्रवादीचा युवक जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा काल दि. १० जुलै रोजी भर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमानी संगनमत करुन गाडी आडवी मारून, पाठलाग करून त्यांच्या डोक्यातधारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खुन केला होता, या घटनेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी भेट देवुन या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सदर गुन्हयातील आरोपीच्या शोधासाठी दोन पथक तयार केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पाटोळे राहत असलेले वाघमोडे नगर मधील त्यांचे मित्र, नातेवाईकांसह पाहुण्यांकडे चौकशी करत असताना पथकातील पोलीस नाईक सागर लवटे यांना माहिती मिळाली की, दत्तात्रय पाटोळे यांचा काही दिवसापुर्वी किरकोळ कारणावरुन निलेश गडदे याच्यासोबत झाला होता, याचा राग मनात धरुन निलेश गडदे व त्याच्या मित्रांनी मिळून हा खुन केला असल्याचे समजले. सदरचे आरोपी हे जत तालुक्यातील जिरग्याळ येथील शेतामध्ये लपून बसल्याची माहीती मिळाली, माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा मारुन पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे दत्तात्रय पाटोळे यांच्या खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने निलेश गडदे याचे कडे चौकशी करता. सदरचा गुन्हा मी माझे साथीदार यांनी यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्याचा खुन केला असल्याचे सागितले. त्याने खून केल्याची कबुली देताच या हत्ये प्रकरणी निलेश विठोबा गडदे, सचिन अज्ञान चव्हाण, वैभव विष्णु शेजाळ, मृत्युंजय नारायण पाटोळे आणि किरण शंकर लोखंडे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना पुढील तपास कामी कुपवाड एमआयडीसी ठाणेकडे वर्ग करणेत आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.