हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही रक्कम गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर ठरविण्यात आले आहेत. शासनाने २ जून रोजी या समितीची नियुक्ती केली होती. देशातील ८८ प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची मान्यता आयसीएमआर ने दिली होती. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रयोगशाळांमध्ये ते ४५००रु आकारतात.
या चाचण्यांसाठी लागणारे किट्स परदेशातून मागवावे लागतात असे कारण पूर्वी खासगी प्रयोगशाळा देत होत्या, मात्र आता भारतात हे किट्स तयार केले जात असल्याने दर कमी करावेत असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी प्रयोगशाळांना सांगितले. हे दर कमी करण्यासाठी त्यांनी चार सदस्यांची समिती सथापन केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश आहे. आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात सहा लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. खाजगी प्रयोगशाळांचे अहवाल मिळण्यासाठी तीन ते सहा दिवस लागत होते आता हे अहवाल २४ तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात सध्या दहा लाख लोकांच्या मागे २३६५ चाचण्या केल्या जातात. महाराष्ट्रात हे प्रमाण १३ हजार इतके आहे. देशात एकूण ५५५ प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील ८८ प्रयोगशाळांचा समावेश आहे. कोरोनासठी सॅम्पल गोळा करण्यापासून ते चाचणीचा निकाल देईपर्यंत येणाऱ्या प्रत्येक खर्चाचा सविस्तर आढावा या समितीने घेतला आहे.
त्यानंतर सॅम्पल थेट आरोग्य केंद्रातून गोळा करून चाचणी करावयाची झाल्यास २२०० रुपये चाचणीसाठी आकारावे तसेच जर रुग्णाकडून रुग्णालयात जाऊन अथवा घरी जाऊन सॅम्पल घेऊन चाचणी केल्यास २८०० रुपये आकारण्यात यावे अशी शिफारस डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समितीने केली आहे. या शिवाय चाचणीसाठी लागणाऱ्या रिएजंट व अन्य गोष्टींवरील जीएसटी रद्द केल्यास चाचणीचे दर आणखी कमी होतील असे या अहवालात नमूद केले आहे. या समितीचा अहवाल शासनाने लागू केल्यास करोना चाचणीसाठी ४५०० रुपयांऐवजी २८०० रुपये आकारले जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.