रत्नागिरी । कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला आहे. रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचे सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी “ट्रक” (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे. ओरिजिनल ट्रकला जे बाह्य पार्ट्स दिसतात, ते सर्व पार्ट या लॉरीला तयार करण्यात आले आहेत.
हा सर्वच्या सर्व ट्रक अगदी जसाच्या तसा तयार केला आहे. ट्रकची चेसी, हौदा, चाके, समोरील बाजू, मागील बाजू, अंतर्गत रचना, अगदी काचेवरील वायफरही अगदी जसाच्या तसा बनविण्यात आले आहेत. या ट्रककडे पाहून माचकर पितापुत्रांनी किती बारकाईने काम केलेय याची कल्पना येते. विशेष म्हणजे या ट्रेकचे हेडलाईट पेटतात, इंडिकेटर देखील चमकतात. हा ट्रक बनविण्यासाठी त्यांना साधारण पाऊण महिना लागला. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीमधील त्यांच्या “विश्वकर्मा डेकोरेटर्स” या कारखान्यात त्यांनी हा ट्रक बनवला. यासाठी त्यांनी अगदी बारकाईने अभ्यास केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला ओरिजिनल ट्रकचे फोटो काढण्यात आले. मग फुटाला इंच अशी लांबी घेऊन हे हुबेहूब ट्रकचे मॉडेल बनविण्यात आले. ओरिजिनल ट्रक साडेबत्तीस फूट आहे. तर या लाकडी ट्रकची लांबी साडेबत्तीस इंच आहे. ट्रक तयार झाल्यावर रंगकामात रत्नागिरीतील मूर्तीकार, मेकअपमन नरेश पांचाळ, प्रथमेश व चिन्मय पांचाळ यांनी मदत केली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यावसायिक व संगीत क्षेत्रातील कलाकार गौरांग आगाशे यांनी त्यांचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मित्र पराग सावंत याला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी हा ट्रक संतोष माचकर यांच्याकडून बनवून घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.