हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील ३२ देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर मान्यता देत कोरोना संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो असे सांगितले आहे. जरी हे मान्य केले असले तरी यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ही मार्गदर्शक सूची कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगण्यात आले आहे.
काही विशेष स्थान आणि जागांवरून कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे. गर्दीच्या ठिकाणावरून एरोसोल ट्रान्स्मिशनसोबतच हॉलमधून, रेस्टारंट तसेच फिटनेस क्लासेसमध्ये सुद्धा कोरोना विषाणू हवेतून पसरू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबरोबरच बाधित व्यक्ती अधिक काळ बंद खोलीत राहिली तरी विषाणू संसर्ग होऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान जगभरातील विविध शास्त्रज्ञांसोबत जागतिक आरोग्य संघटना यासंदर्भात बोलत आहे.
रुग्णांच्या शिंकण्यातून, खोकल्यातून तसेच बोलतेवेळी लाळेच्या माध्यमातून इतरांनाही या विषाणूची लागण होते. बाधित रुग्णाने हाताळलेल्या वस्तूंवर जसे टेबल, खुर्ची, उपकरणास आपण हाताळले तर त्यातूनही कोरोना विषाणूची लागण होते. त्यामुळे या वस्तू सॅनिटाईझ होणे आवश्यक आहेत. म्हणूनच फेस मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सतत हात धुणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.