हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील निधी हा या आजाराशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतो आहे. असे असताना देखील राज्य शासनाने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा कार खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठीच कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते असे असून सहा कार खरेदीसाठी पैसे कुठून आले असा प्रश्न विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्य शासनाने मंत्र्यांसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सहा कार्सच्या खरेदीला मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन निर्णयानुसार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या पाच पदांसाठी पाच कार आणि एक स्टाफ कारसाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, शालेय शिक्षण राज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि कार्यालयीन वापराकरीता स्टाफ कार यांचा समावेश आहे.
सध्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कार्यालयीन वापरासाठी शासकीय वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने त्यासाठी वाहन खरेदीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार, ‘इनोव्हा क्रिस्टा सेव्हन सीटर’ किंमत २२,८३,०८६ रुपये या कारच्या खरेदीला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. राज्यस्तरीय वाहन आढावा समिती, अर्थ मंत्रालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र सध्या शासनाकडेच पैसे नसताना सरकारची प्राथमिकता कोणती आहे? असा प्रश्न करत फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.