महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजीनाट्य सुरू झालं आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विटरवर ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? असा सवाल उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे समजत आहे. ‘जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचे फोटो असणं गरजेचं आहे. सत्यजीत तांबे यांनी त्याच भावनेतून ट्विट केलं असेल. पण सुभाष देसाई यांनी याबाबत फोन करून दिलगिरी व्यक्त केली आहे,’ असं थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारनं अलीकडंच ‘महाजॉब्स’ हे ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलची जाहिरात सध्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र आहे. त्याचबरोबर सुभाष देसाई, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक व आदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. हे सगळे मंत्री शिवसेना व राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचे छायाचित्र जाहिरातीत नाही. त्यावरूनच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

‘महाजॉब्स’ ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? महाविकास आघाडी होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खासदार राजीव सातव यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. ‘सरकार आघाडीचे आहे. जनतेसमोर जाताना सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा सातव यांनी व्यक्त केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.