धक्कादायक! नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या डोक्यात शिक्षक बापाने घातला रॉड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने शिक्षक असलेल्या बापाकडे साडेतीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. याशिवाय राहते घर नावावर करून द्यावे, यासाठी तो रोज घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने झोपेतच मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. दोन अज्ञात तरुणांनी मुलावर हल्ला केल्याचा बनाव करून त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, पोलिसांनी अवघ्या सहा तासात बापाला अटक करून खरा प्रकार उघडकीस आणला.

सांगलीतील शंभर फुटी रोड परिसरात रामकृष्ण परमहंस सोसायटीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. यात प्रतीक राजेंद्र गाडेकर (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी राजेंद्र हिंदुराव गाडेकर (वय ५७) यांना अटक केली आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गाडेकर हे शिक्षक आहेत. रामकृष्ण परमहंस सोसायटीतील स्वप्नपूर्ती बंगल्यात ते पत्नी आणि एकुलत्या एक मुलासह राहत होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा त्यांच्या मुलगा प्रतीक हा गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता.

साडेतीन लाख रुपये माझ्या बँक खात्यावर जमा करावे आणि राहता बंगला माझ्या नावावर करावा, असा तगादा त्याने आई-वडिलांकडे लावला होता. यावरून तो वारंवार आई-वडिलांशी वाद घालत होता. वडिलांनी त्याला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र, नशेच्या आहारी गेलेला मुलगा काही केल्या ऐकत नव्हता.

राजेंद्र गाडेकर यांनी सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हॉलमध्ये झोपलेल्या मुलाच्या डोक्यात आणि कपाळावर लोखंडी रॉडने प्रहार केला. यानंतर काही वेळाने त्यांनी बेशुद्धावस्थेतील मुलाला उपचारासाठी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन अज्ञात तरुणांनी घरात घुसून मुलाच्या डोक्यात रॉड घातला, अशी माहिती देऊन त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आसपासच्या रहिवाशांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना राजेंद्र गाडेकर यांच्या बोलण्यातील विसंगती आढळली. अधिक चौकशीदरम्यान राजेंद्र गाडेकर यांनी आपणच मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली. नशेच्या आहारी गेलेल्या मुलाकडून पैशांसाठी वारंवार तगादा सुरू असल्याने आपण हे कृत्य केल्याची त्यांनी पोलिसांकडे कबुली दिली. पोलिसांनी अवघ्या सहा तासात गाडेकर यांचा बनव उघडकीस आणून गुन्ह्यांची उकल केली. पोलिसांनी गाडेकर यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

कुटुंब झाले उद्धवस्त
शिक्षक असलेले राजेंद्र गाडेकर यांचे त्रिकोणी कुटुंब काही दिवसांपूर्वी आनंदात जगत होते. परमहंस सोसायटीतील टुमदार बंगल्याला त्यांनी स्वप्नपूर्ती असे नाव दिले होते. मुलाच्या वाह्यातपणामुळे या कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट लागली. बापाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मुलगा आता रुग्णालयात आहे, तर बाप पोलिस कोठडीत आहे. या दुर्दैवी घटनेत आईला फिर्यादी व्हावे लागले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment