मुंबई । उत्तरप्रदेशच्या कानपुर मध्ये हिस्ट्रीशीटर म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या विकास दुबेला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. या घटनेला ५-६ दिवस उलटल्यानंतर विकास दुबे पोलिसांच्या हाती सापडला होता. त्याला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा एनकाऊंटर करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबेला ठार केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतक्रिया देत हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी चकमकीचं समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत असं आवाहन केलं आहे. मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असं वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे असं म्हटलं.
सामना कार्यालयात प्रसारमाध्यामांशी संवाद साधत असताना त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान विकास दुबेचे एनकाऊंटर झाले असले तरी सोशल मीडियावर यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास दुबे पोलिसांची गाडी पलटल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.