उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

‘जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. लातूरमध्ये आयोजित प्रचार सभेत शिंदे बोलत होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा लातूर मध्ये झाल्या. यावेळी शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद पाडून राज्यातील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, आमचा पक्ष तुमच्यासाठी कार्य करेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उमरगा  येथील सभेत केले.

काश्मिरचे राहु दे; वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचारावर बोला!- विश्वजीत कदम

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कश्मिरमधील कलम ३७० चा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. राज्यातील वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, बंद पडलेले उद्योगधंदे या विषयावर एक शब्द उच्चारला जात नाही. केवळ जनतेची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे. जनतेने भाजपचे आता कारस्थान ओळखावे व सांगली पुन्हा कॉंग्रेसच्या विचाराची करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ येथे सभा पार पडली. या सभेत विश्वजीत कदम बोलत होते.

भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांकडून ट्रोल

प्रचाराच्या वेगात शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात झालेल्या चुकांमुळे कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांमधून चांगलेच ट्रोल होत आहेत. आज दिवसभर या जहिरनाम्यातील चुकीमुळे सोशल मिडिया मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

गावकऱ्यांनी केली भाजप आमदाराला ‘गावबंदी’ बैलगाड्या आडव्या लावून अडवली गाडी

निवडणूक प्रचारासाठी गावात येत असलेल्या भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदाराची गाडी गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या करून अडवली. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे हा प्रकार घडला. अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना वान प्रकल्पाच्या मुद्द्यावरून परिसरातील काही गावांनी गावबंदी केली आहे.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.

नथुराम गोडसेंच्या भक्तांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये – भूपेश बघेल

भाजप आरएसएसचा राष्ट्रवाद मुसोलिनी, हिटलरच्या विचाराने प्रेरित दुटप्पी राष्ट्रवाद असून नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यासाठी नांदगाव पेठ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.