उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

‘जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. लातूरमध्ये आयोजित प्रचार सभेत शिंदे बोलत होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा लातूर मध्ये झाल्या. यावेळी शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

गावकऱ्यांनी केली भाजप आमदाराला ‘गावबंदी’ बैलगाड्या आडव्या लावून अडवली गाडी

निवडणूक प्रचारासाठी गावात येत असलेल्या भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदाराची गाडी गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या करून अडवली. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे हा प्रकार घडला. अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना वान प्रकल्पाच्या मुद्द्यावरून परिसरातील काही गावांनी गावबंदी केली आहे.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

”२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ काल वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? हा खरा प्रश्न आहे – शरद पवार

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या निवडणूक प्रचारातील ३७० च्या मुद्द्यावर टीका केली. देशात कलम ३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे सांगत पवार यांनी आपले मत जाहीर सभेत प्रकट केले.

‘चला हवा येउ द्या’ फेम भारत गणेशपुरे निवडणूक प्रचार मैदानात

बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांना विजयी करण्याचे आवाहन करण्याकरिता मराठी विनोदी अभिनेते “चला हवा येउ द्या ” फेम भारत गणेशपुरे पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळालेत. रविवारी सकाळी अमरावती शहरातील साई नगर, गोपाळ नगर, गणेश कॉलनी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसह बंड यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेमधे मराठी सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी सहभागी होऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत प्रीतीताई बंड यांना विजयी करण्याचे आवाहन केले.